‘अशी ही बनवाबनवी’ची 29 वर्षे : आता या जगात नाहीत चित्रपटातील हे कलाकार

10868
SHARE
Loading...

‘अशी ही बनवाबनवी’ हा सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केलेला एक लोकप्रिय मराठी चित्रपट. या चित्रपटाच्या रिलीजला आज 29 वर्षे पूर्ण झाली आहेत. 23 सप्टेंबर 1988 रोजी हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला आला होता. रिलीजच्या एवढ्या वर्षांनंतरही या चित्रपटाची लोकप्रियता मुळीच कमी झालेली नाही. मराठी चित्रसृष्टीत विनोदी चित्रपटांच्या आलेल्या लाटेतील हा एक विशेष महत्त्वाचा चित्रपट असून अजूनही सिनेरसिकांमध्ये लोकप्रिय आहे.
अनेक उपद्व्यापानंतर शेवटी घरमालकाने घरातून हाकलून दिल्यावर नवीन जागा भाड्याने मिळवण्यासाठी चार मित्रांना काय काय प्रताप करावे लागले याची मजेदार गोष्ट म्हणजे “अशी ही बनवाबनवी” हा चित्रपट आहे.
ही आहे चित्रपटाची कथा..
धनंजय, शंतनू, परश्या आणि सुधीर हे चौघे एकाच गावात राहणारे परममित्र. नोकरीसाठी धनंजय गाव सोडून पुण्याला येतो. त्याचा धाकटा भाऊ शंतनू हा वैद्यकीय शिक्षण घेत असतो. त्याला अभ्यासाची सुटी लागल्यामुळे तो आपल्या भावाकडे पुण्याला येतो. धनंजयचे घरमालक विश्वास सरपोतदार हे टिपीकल पुणेरी व्यक्तिमत्व असते. धनंजयचा भाऊ त्याच्याकडे (म्हणजे आपल्या मालकीच्या खोलीत) राहणार हे त्यांना पटत नाही. जास्त भाडे आकारुन ते शंतनूला तिथे राहण्याची परवानगी देतात. थोड्याच दिवसांनी आपल्या काकाबरोबर भांडण झाल्यामुळे सुधीर आणि आपल्या प्रेमप्रकरणाचा मुलीच्या बापाला पत्ता लागल्यामुळे नोकरी गमावलेला परश्या आपले नशीब आजमावण्यासाठी एकामागे एक पुण्याला येतात. पुण्यात त्यांच्या ओळखीचे दुसरे कोणी नसल्यामुळे त्यांना अर्थातच धनंजयकडे राहावे लागते. खडूस घरमालक घरात राहण्याची परवानगी देणार नाहीत हे जाणून धनंजय त्या दोघांनाही चोरून घरात राहण्याची सोय करतो.

दरम्यान सुधीरला एका संगीत विद्यालयात नोकरी मिळते. त्या आनंदात सुधीर, धनंजय, परश्या दारु पिऊन घरी येतात आणि घरमालकाच्या घरी गोंधळ घालतात. येथे सुधीर आणि परश्या हे दोघे चोरुन घरात राहत असल्याचे बिंग फुटते आणि घरमालक धनंजयला एका आठवड्याच्या आत घर खाली करण्यास सांगतात. मात्र या अविवाहित तरुणांना पुण्यात घर मिळणे अतिशय अवघड जाते. शेवटी त्यांना हवी तशी जागा सापडते पण घराच्या मालकीणबाई लीलाबाई काळभोर यांची अट असते की त्या भाडेकरु म्हणून केवळ लग्न झालेल्या दांपत्याचाच विचार करतील. लीलाबाईंचा पुतण्या बळी त्यांच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून असतो आणि लीलाबाईंची मोलकरीण तानू हीसुद्धा त्याला सामील असते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने लीलाबाईंसाठी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असतो.
येथे धनंजय अशी युक्ती सुचवतो की परश्या आणि सुधीर यांनी अनुक्रमे धनंजय आणि शंतनूची बायको व्हायचे ज्यामुळे काळभोरांच्या बंगल्यात राहण्यासाठी आवश्यक असलेली दांपत्याची अट ते पाळू शकतील. दरम्यान चौघांनीही दुसरे घर शोधण्यासाठी चालू असलेला खटाटोप सुरुच ठेवायचा. सुरुवातीला परश्या आणि सुधीर या प्रस्तावाला विरोध करतात पण दुसरा काहीच पर्याय राहिला नसल्याने शेवटी तयार होतात. अशा प्रकारे धनंजय – पार्वती (परश्या) आणि शंतनू – सुधा (सुधीर) हे जोडीने लीलाबाईंच्या बंगल्यात राहायला जातात.

त्यांचे नाटक अपेक्षेप्रमाणे यशस्वी होत असतानाच लीलाबाईंची भाची मनीषा आपली मैत्रीण सुषमा हिच्यासोबत सुटीसाठी पुण्याला येते. सुषमा ही कॉलेजमधली शंतनूची प्रेयसी. मनीषाला पाहून सुधीर तिच्या प्रेमात पडतो. या काळातच धनंजयने त्याच्या बॉस माधुरी आणि परश्याने आपली बालमैत्रीण कमळी यांच्याबरोबर सूत जमवलेले असते. अनेक समज-गैरसमजांनंतर शेवटी धनंजय-मित्रमंडळींचे भांडे फुटतेच. मात्र लीलाबाईंना त्यांनी केलेली मदत आणि बळीपासून लीलाबाईंचा केलेला बचाव पाहून लीलाबाई त्यांना क्षमा करतात आणि इथे चित्रपटाची इथे सुखद द एंड होतो.
हे कलाकार होते प्रमुख भूमिकेत…
या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे (परशुराम), अशोक सराफ (धनंजय माने), सुशांत रे (शंतनू माने), सचिन पिळगांवकर (सुधीर), सुप्रिया पिळगांवकर (मनीषा), निवेदिता जोशी (सुषमा), प्रिया अरुण (कमळी), अश्विनी भावे (माधुरी), सुधीर जोशी (विश्वास सरपोतदार), नयनतारा (लीलाबाई काळभोर) आणि विजू खोटे (बळी) या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या.
या चित्रपटातील काही कलाकार आता या जगात नाहीत. चित्रपटाच्या रिलीजला 29 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जाणून घेऊयात, कोणकोणते कलाकार आता आपल्यात नाहीत, आणि इतर कलाकारांचे सध्या काय सुरु आहे…

लक्ष्मीकांत बेर्डे

दुर्दैवाने मराठी चित्रपटातील लाडका अभिनेता लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नाहीत. 16 डिसेंबर 2004 रोजी त्यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांचा ‘खतरनाक’ हा 2004 साली शेवटचा मराठी चित्रपट होता. लक्ष्मीकांत यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटात परशुराम आणि स्त्रीवेशातील पार्वतीची भूमिका करुन प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पाडले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांना स्वानंदी आणि अभिनय ही दोन मुले आहेत. स्वानंदीचे महाविद्यालयीन शिक्षण सुरु असून अभिनयची मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री झाली आहे. ती सध्या काय करते या चित्रपटातून अभिनयचे याचवर्षी मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले असून लवकरच तो सचिन पिळगांवकर यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

अशोक सराफ

या चित्रपटात धनंजय माने ही व्यक्तिरेखा साकारणारे अशोक सराफ यांनी अलीकडेच वयाची 70 वर्षे पूर्ण केली आहेत. अभिनेत्री निवेदिता सराफ या त्यांच्या पत्नी असून या दाम्पत्याला अनिकेत हा एक मुलगा आहे. अनिकेत प्रसिद्ध शेफ असून परदेशी असतो. अशोक सराफ वयाच्या सत्तरीतही चित्रपटसृष्टीत कार्यरत असून अलीकडेच त्यांचे शेंटिमेंटल हा चित्रपट रिलीज झाला. तर सध्या ते शिवाजी पार्क मुंबई 28 या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहेत.

अश्विनी भावे

चित्रपटात एका कॉस्मेटीक स्टोरच्या मालकिणीच्या भूमिकेत असलेल्या अश्विनी भावे सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. त्यांनी चित्रपटात माधुरी मॅडमची व्यक्तिरेखा साकारली होती. अमेरिकेत असूनदेखील त्या चित्रपटसृष्टीपासून दुरावलेल्या नाहीत. मराठी चित्रपटसृष्टीत त्या अॅक्टिव असून नुकतीच त्यांनी त्यांची ऑफिशिअल वेबसाइट लाँच केली आहे. ध्यानीमनी, मांजा हे अश्विनी यांचे अलीकडच्या काळात रिलीज झालेले चित्रपट आहेत. विशेष म्हणजे अश्विनी लवकरच एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची चर्चा आहे.

सिद्धार्थ रे

हिंदी तसेच मराठी चित्रपटात अभिनय केलेले अभिनेता सिद्धार्थ रे आता या जगात नाहीत. या चित्रपटात सिद्धार्थ यांनी मेडिकलचा विद्यार्थी शंतनु माने म्हणजेच अशोक सराफच्या लहान भावाची भूमिका केली होती. अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासोबत चित्रपटात त्यांची जोडी जमली होती. सिद्धार्थ रे हे व्ही. शांताराम यांचे नातू होते.

सुधीर जोशी

चित्रपटात अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या घरमालकाची म्हणजेच विश्वास सरपोतदारची भूमिका सुधीर जोशी यांनी केली होती. सुधीर जोशी यांचे काही वर्षांपूर्वी मुंबईत हार्ट अॅटॅकने निधन झाले.

नयनतारा

चित्रपटात लीलाबाई काळभोर ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नयनतारा आता आपल्यात नाहीत. यांचे वयाच्या 64 व्या 2014 साली निधन झाले. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आई अशी त्यांची खास ओळख होती. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांची या चित्रपटातील घरमालकिणीची भूमिका कायम लक्षात राहील अशीच आहे.

निवेदिता जोशी

अभिनेत्री निवेदिता जोशी यांनी चित्रपटात सुषमा नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. यात त्यांची जोडी अभिनेता सिद्धार्थ रेसोबत जमली होती. निवेदिता जोशी सध्या मराठी तसेच हिंदी मालिकांत काम करतात. अशोक सराफ यांच्या त्या पत्नी आहेत. सध्या त्यांची दुहेरी ही मालिका छोट्या पडद्यावर सुरु आहे.

प्रिया अरुण-बेर्डे

अभिनेत्री आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया या आजही मराठी चित्रपटसृष्टीत अॅक्टिव आहेत. लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर त्यांनी अभिनय सोडला नाही. या चित्रपटात प्रिया यांनी कमला नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. चित्रपटात त्यांची जोडी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत जमली होती.

सचिन पिळगांवकर

अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी सुधीर आणि स्त्रीवेशेतील सुधा अशा दोन भूमिका या चित्रपटात साकारल्या होत्या. त्यांनी साकारलेली सुधा प्रेक्षकांना खूपच भावली होती. यात सचिनने कामाच्या शोधात पुण्यात आलेल्या अशोक सराफ यांच्या मित्राची भूमिका होती. सचिन हेच या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर या सचिन यांच्या पत्नी असून या दाम्पत्याला श्रिया ही एक मुलगी आहे. श्रियासुद्धा सिनेसृष्टीत कार्यरत आहे.

सुप्रिया पिळगांवकर

मराठी तसेच हिंदी मालिका आणि चित्रपटातील गुणी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ मध्ये मनिषा नावाच्या तरुणीची भूमिका साकारली होती. यात त्यांची जोडी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार सचिन पिळगावकर यांच्याबरोबर होती. सुप्रिया आजही मराठी-हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत आहेत.

विजू खोटे

विजू खोटे हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. आता वाढत्या वयामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीतील काम कमी केले आहे. मोठ्या पडद्यासोबतच त्यांनी छोट्या पडद्यावरही काम केले आहे. अशी ही बनवाबनवी या चित्रपटात त्यांनी बाली नावाची खलनायकाची व्यक्तिरेखा साकारली होती.

Loading...